जळगाव प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबाची ईडी चौकशी संपत नाही तोच त्यांची कन्या अध्यक्षा असणार्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची चौकशीसाठी नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, भोसरी येतील वादग्रस्त भूखंड खरेदी केल्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गोत्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांची ईडी चौकशी झाली असून त्यांचे जावई गिरीश चौधरी हे ५ जुलैपासून ईडीच्या अटकेत आहेत. यानंतर खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांची देखील चौकशी अजून बाकी आहे. दरम्यान, हे सारे होत असतांना आता नाथाभाऊंनी कन्या रोहिणी खडसे या अध्यक्षा असणार्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठविल्याची माहिती आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यातच आता ईडीची नोटीस आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने जिल्हा बँकेशी संबंधीत पदाधिकार्यांना बोलते केले असता कुणाला याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले. तसेच या नोटीसमध्ये नेमकी कोणत्या प्रकरणाबाबत चौकशी होणार आहे याबाबतही अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, जिल्हा बँकेच्या पदाधिकार्यांना आम्ही संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता याबाबत कुणीही बोलण्यासाठी तयार नसल्याचे दिसून आले.