अ‍ॅक्झॉन कोविड केअर हॉस्पीटलचा परवाना रद्द

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या अ‍ॅक्झॉन कोविड केअर हॉस्पीटलचा परवाना आज सिव्हील सर्जन यांनी रद्द केला आहे. महापौर व उपमहापौरांनी झाडाझडती घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तर, यावर प्रतिक्रिया देतांना आता तरी रूग्णालयांनी सर्वसामान्यांची लुट करू नये असा इशारा देखील कुलभूषण पाटील यांनी दिला आहे.

डॉ. निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्झॉन हॉस्पीटलमधील डेडीकेटेड कोविड केअर हॉस्पीटल बाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. या प्रामुख्याने रूग्णांना अवाजवी बीलाची आकारणी करण्याचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. याबाबत ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी टाकलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल देखील झाली होती.

दरम्यान, आज महापौर सौ. जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अ‍ॅक्झॉन ब्रेस हॉस्पीटलमधील कोविड केअर रूग्णालयामध्ये झाडाझडती घेतली. यात उपमहापौर पाटील यांनी बीलाबाबतच्या तक्रारीबाबत रूग्णालयाच्या प्रशासनाला खडसावले.

यानंतर सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी अ‍ॅक्झॉन ब्रेन हॉस्पीटलमधील कोविड केअर रूग्णालयाचा परवाना रद्द करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोविडच्या आपत्तीमध्ये काही रूग्णालये हे माणुसकी विसरल्यागत काम करत आहेत. रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल वसुलीच्या अनेक तक्रारी आहेत. आता तरी रूग्णालयांनी सर्वसामान्यांची लुट करू नये असा इशारा देखील कुलभूषण पाटील यांनी दिला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.