जिल्ह्यातील २३ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त-जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ४९ हजार २८४ इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्ण वाढत आहेत. परंतु, आजवर २३ हजारांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत ३ हजार ६५१ प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची चाचणी करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर उपाय म्हणून प्रशासनातर्फे संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. एका दिवसात (७ सप्टेंबर रोजी) ४ हजार ८५ संशयित व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ४९ हजार २८४ इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्ण वाढत आहेत. परंतु जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या ९ हजार ३९८ बाधित रुग्णांपैकी ८ हजार १५४ रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये तर जागरुक राहून आपल्या कुटूंबात कुणालाही कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नागरीकांना केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या १ लाख ४९ हजार २८४ चाचण्यांपैकी १ लाख १४ हजार २६७ अहवाल निगेटिव्ह तर ३३ हजार ६१८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण हे २२.५१ टक्के इतके आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २३ हजार ४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ६९.४३ टक्के इतके वाढले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी नमूद केले आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याबरोबर त्याचे रहिवासी भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून या परिसराचे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमार्फत निर्जतुकीकरण करण्यात येते. तसेच या भागातील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात १४९०, जिल्ह्यातील नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात १०५३ तर जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात ११०८ भाग हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या भागात शासनाच्या नियमांचे व्यवस्थित पालन होत आहे किंवा कसे याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. या अधिकार्‍यांमार्फत तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्यात येत असून तेथील ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रीसुत्रीनुसार गृह विलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांशी व नागरीकांशी संवाद साधण्यात येऊन त्यांना शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहनही या अधिकार्‍यांमार्फत करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

Protected Content