जिल्हाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपाने हॉस्पीटलचे बील झाले कमी !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने सक्त निर्देश देऊनही अनेक ठिकाणी बिलांची अवाजवी आकारणी करण्यात येत आहे. असाच एक प्रकार घडला असता संबंधीतांनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांचे बील कमी करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या उपचारासाठी दर ठरवून दिले असून याची माहिती दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र याचे सर्रास उल्लंघन होतांना दिसून येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील महिलेला मेहरूण येथील सारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने १३ दिवसांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावलेले नसतानाही १ लाख ७१ हजार ५५० रुपये अतिरिक्त बिल आकारल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली. त्यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षकांनी रुग्णाची बिले तपासल्यानंतर रुग्णालयाने अतिरिक्त लावलेले बिल कमी करून रुग्णाला केवळ ६७ हजार ६०० रुपयांचे बिल आकारले.

नाचणखेडा येथील शोएबनूर मोहंमद पटेल यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सारा हॉस्पिटलबाबत तक्रार केली होती. शोएबनूर यांच्या काकू शहेनाजबी आबेद पटेल (रा.नाचणखेडा) यांना २ एप्रिल रोजी उपचारासाठी सारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर त्यांना नाकात फंगस वाढत असल्याने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर सर्व औषधी व इंजेक्शन डिस्चार्ज होईपर्यंत बाहेरून आणले. १३ दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी १ लाख ७१ हजार ५५० रुपयांचे बिल देण्यात आले. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत बिल कमी करण्यात आले.

Protected Content