महावितरणच्या विभागीय कार्यालयाजवळ आग; दस्तऐवज जळून खाक

चाळीसगाव प्रतिनिधी। शहरातील हिरापूर रोडवरील विभागीय कार्यालयाच्या जवळ आग लागल्याने यात दस्तऐवज जळून खाक झाले असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हिरापूर रोडवरील महावितरण विभागीय कार्यालयात रेकॉर्ड रूम नसल्याने जुने दस्तऐवज कार्यालयाला लागून ठेवण्यात आले होते. मात्र कंपाऊंडच्या बाजूला कचरा पेटवण्यासाठी कोणीतरी आग लावल्याने त्याची ठिणगी पडल्याने त्यात दस्तऐवज जळून नुकसान झाल्याने याबाबत शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत वृत्त असे की, हिरापूर रोडवरील २२० के.व्ही. पारेषण उपकेंद्रा जवळच्या महावितरण विभागीय कार्यालयात रेकॉर्ड रूम नसल्याने जुने पत्रक, कोर्ट केस फाईल, आयकल फाईल तसेच महत्वाचे दस्तऐवज कार्यालयाला लागून ठेवण्यात आले होते. मात्र १५ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास सदर कार्यालयाच्या कंपाऊंडला लागून बखळ प्लॉटमध्ये कोणीतरी कचरा पेटवण्यासाठी आग लावली. त्याची ठिणगी वार्‍यामुळे पडल्याने त्यात जुने पत्रक, कोर्ट केस फाईल, आयकल फाईल तसेच महत्वाचे दस्तऐवज जळून नष्ट झाले.

दरम्यान शिपाई प्रताप गावीत यांच्या लक्षात येताच त्यांनी उप व्यवस्थापक बाबूराव सोनवणे यांना या घटनेची माहिती दिली. लागलीच उप व्यवस्थापक बाबूराव सोनवणे, शिपाई प्रताप गावीत, सहा अभियंता जयेश सुर्यवंशी, लिपिक स्वप्नील पाटील, लिपिक रविंद्र सुर्यवंशी, लिपिक संदीप ठाकूर, लिपिक रविंद्र राठोड व लिपिक चंद्रकांत घुमरे आदींनी आग नळीच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना यश आले नाही. यामुळे त्वरीत अग्निशमन दल व वरिष्ठ अधिकारी अमोल गढरी यांना घटनेची माहिती दिली. तेव्हा काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाडीसह गढरी उपस्थित झाले. त्यांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश आले. परंतु त्यात जुने दस्तऐवज पूर्ण जळून नष्ट झाले.

याबाबत उप व्यवस्थापक बाबूराव सोनवणे यांनी रात्री ८ वाजता शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.ना/२९०४ भट्टू पाटील हे करीत आहेत.

Protected Content