भुसावळात ऑक्सीजन अभावी रुग्णांचे प्राण धोक्यात !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. मात्र बुधवारी ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला असून पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सीजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीमुळे रुग्णांचा जीव टांगणीला आहे. 

भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील करोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून ऑक्सीजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडी देखील दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तिव्र टंचाई असल्याने डिस्टीब्युटरने बुधवारी ऑक्सीजन पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलेंडर उपलब्ध होते. यामुळे केवळ सायंकाळपर्यंत रुग्णांना ऑक्सीजन देता येणार होता. यामुळे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी चिंतेत होते. 

जिल्हा प्रशासकिय यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी ही सर्व बिकट परिस्थिती पाहूनही ठोस निर्णय घेत नसल्याने १४ रुग्णांचा जिव टांगणीला आहे. ऑक्सीजनचा पुरवठा हेात नसेल तर उपचार होतील कसे? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

 

Protected Content