ग्रामीण भागातील शाळांमध्ये वाजली घंटा : पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आजपासून कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या ग्रामीण भागातील पहिले तर बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत.

कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची चिन्हे दिसताच जळगाव जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. अलीकडच्या काळात संसर्ग वाढीस लागला असला तरी हॉस्पीटलायझेशनचे प्रमाण मर्यादीत असल्याचे दिसून आल्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २४ जानेवारी पासून पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची घोषणा करतांना याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते.

या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते बारावीचे विद्यार्थी आजपासून शाळा व महाविद्यालयांमध्ये गेले आहेत. राज्य शासनाचे निर्देश, जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीनंतर स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्या, पालकांच्या संमतीचे तांत्रिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करताना जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामीण आणि नागरी क्षेत्रातील शाळांची वर्गवारी केलेली आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहेत.

याच्या अंतर्गत आठ लाख विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला. शाळेत येणार्‍या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांसह सर्वांना मास्क सक्तीचा असेल. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर, हॅण्डवॉश ठेवावे लागेल, वर्गात विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करावे लागणार आहे.

प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन होतेय की नाही ? यावर नजर ठेवण्यासाठी गटसाधन केंद्रातील साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, फिरते विशेष शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी हे नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेतील. त्यानंतर हा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांना सादर करणार आहेत. गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत शिक्षणाधिकार्‍यांना अहवाल सादर केला जाणार आहे. यामुळे शाळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिली ते बारावीच्या ३ हजार ३९१ शाळा आजपासून सुरू झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ३ लाख ७५ हजार ४६१ एवढी आहे. त्यानंतर इयत्ता ६ वी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३३ हजार २३५ आहे. एकूण ८ लाख ६० हजार विद्यार्थी आजपासून शाळेत जात आहेत.

Protected Content