उद्यापासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे चार दिवशीय शिबीर

जळगाव, प्रतिनिधी  । चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे तडाखा बसलेल्या भागात मदत व पुनर्वसन कार्य करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पुढाकार घेतला असून शनिवार पासून चार दिवस पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित केले आहे. 

 

चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे मानव व पशु यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. नैसर्गिक आणि मानवी मालमत्तेची अपरिमित हानी झाली असून शासन, दानशुर व्यक्ती व सामाजिक संस्था यांच्या मार्फत पुनर्वसन कार्य सुरू झाले आहे. मात्र, मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमार्फत प्रत्यक्ष पुनर्वसनाचे मदत कार्य केले जाणार आहे. दि. ४ सप्टेबर ते ७ सप्टेबर या चार दिवसांसाठी विद्यापीठ रासेयो विभागामार्फत स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय मंडळाचे एन. वाय. एन. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव यांच्या सहयोगाने पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या अनुषंगाने रासेयोचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधुन या शिबिरात विद्यार्थ्यांना पाठविण्याचे आवाहन केले आहे. चाळीसगाव येथील बी. पी.  महाविद्यालय, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोरा, कला, विज्ञान महाविद्यालय, भडगाव, गरुड महाविद्यालय, शेदुर्णी, किसान महाविद्यालय, पारोळा आणि राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा या महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांचा या शिबिरात सहभाग असणार आहे. डॉ.नन्नवरे यांनी गुरूवारी या शिबिराच्या अनुषंगाने खासदार उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली.

 

Protected Content