जामनेर तालुक्यातील सहा शिक्षक बनले ‘ग्लोबल टीचर’

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी |  इको ट्रेनिंग सेंटर , स्वीडन तर्फे आयोजित इंडिया – बांगलादेश टेली कोलॅबोरेशन प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करून जामनेर तालुक्यातील सहा शिक्षक ‘ग्लोबल टीचर ‘झाले आहेत . नुकत्याच ५ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी त्यांना ऑनलाइन कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

 

जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे  समुपदेशक सुरेश आनंदा सुरवाडे , नितीन सैतवाल ,पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख शंकर रंगनाथ भामेरे , देऊळगाव गुजरी येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयाचे  तंत्रस्नेही शिक्षक महेंद्र गोलंदास इंगळे,  नांद्रा प्रलो येथील  मुख्याध्यापक  किशोर ढेकाळे , नाचणखेडा येथील  महाराष्ट्र विद्यालयाचे विश्वनाथ पानपाटील यांचा यात समावेश आहे .

जगाच्या शाश्वत विकासासाठी युनो या जागतिक संघटनेच्या वतीने  इको ट्रेनिंग सेंटर ,  स्वीडनच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये  शाश्वत मूल्यांची रुजवणूक होण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन सदर प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रकल्पात व्हर्च्युअल टूरच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश मधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी शैक्षणिक – सांस्कृतिक वारश्यांविषयी  आदान -प्रदान केले . इको ट्रेनिंग सेंटरचे राष्ट्रीय समन्वयक प्रा . योगेश सोनवणे , बांगलादेशाचे राष्ट्रीय समन्वयक आयेशा सिद्दीक , इको ट्रेनिंग सेंटरचे जननल सेक्रेटरी  इज्झत हसन  , इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रा .भरत शिरसाठ यांचे  मार्गदर्शन लाभले .

पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या आकांक्षा बळीराम जाधव , कोमल सुनील पाटील , अनिकेत दीपक जाधव , यश रवींद्र पवार या विद्यार्थ्यांनीही यात यशस्वीरित्या सहभाग नोंदविला. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे .

 

Protected Content