Home Cities रावेर शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश


सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासामध्ये स्पर्धा परीक्षांचे मोठे योगदान असते. अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान व्यापक होत असून आत्मविश्वासातही भर पडते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच स्पर्धात्मक वातावरणाची ओळख करून देण्यासाठी जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे विविध स्पर्धा परीक्षांचे सातत्याने आयोजन केले जाते. याच प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्य शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, इयत्ता आठवीतील पार्थ प्रवीण पाटील याने 174 गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले. भवम जितेंद्र पाटील याने 152 गुण मिळवले, तर ज्योतिरादित्य सुनील कोंडे आणि पुष्पक विनोद महाजन यांनी प्रत्येकी 136 गुण प्राप्त करून शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे.

इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी देखील चमकदार कामगिरी करत शाळेचा गौरव वाढवला आहे. नाविन्या प्रकाश बोरोले हिने 190 गुण मिळवत विशेष यश संपादन केले. बुशरा वसीम सय्यद हिने 176 गुण प्राप्त केले, तर आस्था राजेश महाजन आणि ओम दिलीप भारंबे यांनी प्रत्येकी 160 गुण मिळवले. याशिवाय सानवी अजय वारके आणि तनिषा सहदेव काळे यांनी 138 गुण मिळवले असून पुष्कर मनोज राणे याने 136 गुण प्राप्त करून शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मा. शरद महाजन, संपूर्ण संचालक मंडळ, प्राचार्य मोझेस जाधव, पर्यवेक्षिका सौ. पुनम नेहेते तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेकडून विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्यात येत असून, भविष्यातही अशाच प्रकारचे यश मिळवत शाळेचे नाव उंचावावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांकडे प्रेरित करणारा हा निकाल ठरत आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound