Home क्राईम वाळू डंपर सोडण्यासाठी लाच; तलाठी व मंडळ अधिकारी अटकेत

वाळू डंपर सोडण्यासाठी लाच; तलाठी व मंडळ अधिकारी अटकेत

0
122

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाळूने भरलेला डंपर सोडून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी ममुराबाद येथील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. दोघांनी मिळून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी ३० हजार रुपये स्वीकारताना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदार यांचा वाळूने भरलेला डंपर महसूल कर्मचाऱ्यांनी जप्त केला होता. डंपर सोडण्यासाठी तलाठी सदानंद मुंडे आणि मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम देण्यास तक्रारदाराने नकार दिल्यानंतर, अखेर ३० हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली होती.

दरम्यान, तक्रारदाराने या प्रकाराची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. विभागाने सापळा रचून तलाठी सदानंद मुंडे यांना जळगावात ३० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे महसूल विभागातील लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


Protected Content

Play sound