जळगाव प्रतिनिधी । शहरातील इच्छादेवी चौकात असलेल्या स्वामी टॉवरमध्ये राहत असलेले व्यावसायिक प्रकाश साहित्या यांच्याकडे सायंकाळी चार जणांनी बंदूक व तलवारीचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की, जळगावातील बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांचे पुतणे प्रकाश साहित्या हे इच्छादेवी चौकातील स्वामी टॉवरमध्ये राहतात. आज १७ मार्च रोजी सायंकाळी ७.२० वाजता मास्क आणि रुमाल घातलेले चार तरुण त्यांच्या घरात घुसले. घरातील मुलांना धाक दाखवीत दरोड्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी मोबाईल हिसकावत तेथून पलायन केले. मात्र बाहेर जाताना तो मोबाईल देखील फेकून दिल्याचे समजते. अत्यंत गजबज असणार्या भागात साडेसातच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा ताफा हजर झाला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, जिल्हा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, महेंद्र पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली. तर, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.