जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम उद्योजक, लेखक आणि विचारवंत अरूण श्रीपत नारखेडे यांचे आज पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अरूण श्रीपत नारखेडे ( वय ८६) यांचे आज सकाळी देहावसान झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेबारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते डॉ. पराग आणि चंदन नारखेडे तसेच सौ. जयश्री कांचन भगत यांचे वडील होत. त्यांच्या माध्यमातून एक कर्तबगार व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.
अरूण श्रीपत नारखेडे हे मूळचे साळवा ता. धरणगाव (तत्कालीन तालुका एरंडोल) येथील मूळ रहिवासी. १५ नोव्हेंबर १९३६ रोजी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिल बंधू देवरामभाऊ नारखेडे हे ख्यातनाम गांधीवादी तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्व ! नारखेडे बंधूंनी उच्च शिक्षण घेतले. स्वत: अरूणजी हे पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. उत्तीर्ण झाले. मात्र नारखेडे बंधूंच्या वाढत्या वर्चस्वाने दुखावलेल्या काही तत्कालीन मान्यवरांनी कट करून त्यांना एका सामूहिक हत्याकांडात अडकावले. यातून ते तब्बल १० वर्षांनी बाहेर आले. यानंतर त्यांनी उद्योजकतेत यश संपादन केले. अरूण सोप इंडस्ट्रीज, पराग फॅब्रिकेशन आदींच्या माध्यमातून त्यांनी प्रगतीशील आगेकूच केली. तर लेवा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.
दिवंगत अरूण श्रीपत नारखेडे यांनी विपुल लिखाण केले. यात वकिलाची उलट तपासणी आणि न्यायमूर्ती रामानंद या दोन कादंबर्या विशेष गाजल्या. २००६ साली झालेल्या बहिणाबाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती.