ब्रेकींग : जळगाव व रावेर मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली असून यातून जळगाव आणि रावेर या जिल्ह्यातील दोन्ही जागांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

( Image Credit Source : Twitter )

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन देशात विविध टप्प्यांमध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. यंदा सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. यात आपल्या जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांसाठीच्या निवडणुक प्रक्रियेला देखील जाहीर करण्यात आले आहे. यानुसार दोन्ही ठिकाणी १३ मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.

या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत ही २५ एप्रिलपर्यंत राहणार असून २९ एप्रिल पर्यंत माघार घेण्याची मुदत असेल. यानंतर वर नमूद केल्यानुसार १३ मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपने आधीच अनुक्रमे स्मिता वाघ आणि रक्षा खडसे या दोन्ही उमेदवारांची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने मात्र अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आता निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यामुळे लवकरच महाविकास आघाडीचे उमेदवारही जाहीर होतील अशी शक्यता आहे. तर, अन्य पक्ष व अपक्ष उमेदवार देखील रिंगणात राहतील अशी अपेक्षा आहे. दोन्ही ठिकाणी बहुरंगी लढती होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण तापणार असल्याचे देखील निश्‍चीत झाले आहे.

Protected Content