बिगुल फुंकला : लोकसभा निवडणुकीची घोषणा, ‘या’ तारखांना होणार मतदान !

नवी दिल्ली-वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा आज जाहीर करण्यात आली असून या माध्यमातून निवडणुकीचा बिगुल खर्‍या अर्थाने फुंकण्यात आल्याचे दिसून आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिनांक १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेण्याचे कालच जाहीर केले होते. या अनुषंगाने आज दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात प्रारंभी त्यांनी देशातील मतदारांच्या आकडेवारीबाबत विवेचन केले. यानंतर त्यांनी निवडणुकीबाबत माहिती दिली.

या संदर्भात राजीव कुमार म्हणाले की, १६ जून २०२४ रोजी विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ संपत असून याआधी लोकसभा अस्तित्वात येणार असून यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहोत. आधीप्रमाणेच यंदाची लोकसभा निवडणूक ही देखील निष्पक्ष होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यंदा देशात तब्बल ९६.8 कोटी मतदार असून १०.५ लाख निवडणूक बुथवर ही निवडणूक होणार असून यात ५५ लक्ष ईव्हीएम असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीत ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यंग असणारे घरून मत टाकू शकतील अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकांबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाची लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यांमध्ये होणार आहे. यातील पहला टप्पा २० मार्चरोजी सुरू होणार असून याचे मतदान १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसरा टप्पा २८ मार्च रोजी नोटिफीकेशन निघणार असून याचे मतदान २४ एप्रिल रोजी होणार आहे. तिसरा टप्पा नोटिफिकेशन १२ एप्रिल रोजी निघणार असून याचे मतदान ६ मे रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्याचे नोटिफिकेशन १८ एप्रिल रोजी निघणार असून १३ मे रोजी होणार आहे. पाचव्या टप्प्याचे नोटिफिकेशन २६ एप्रील रोजी होणर असून २० मे रोजी मतदान होणार आहे. सातवा टप्पा ७ मे रोजी सुरू होणार असून याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. तर सर्व म्हणजे सातही टप्प्यांमधील निवडणुकांची मतमोजणी मतमोजणी ४ जून २०२४ रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशात आदर्श आचार संहिता देखील लागू करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यामुळे आता खर्‍या अर्थाने रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि कॉंग्रेस तसेच अन्य पक्षाच्या इंडिया आघाडीत जोरदार मुकाबला होईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी अब की बार चारसौ पार अशी घोषणा देऊन आधीच प्रचार सुरू केला आहे. तर, दुसरीकडे राहूल गांधी आणि त्यांचे सहकारी पक्षातील नेत्यांनी देखील सरकारवर टिका करत प्रचार सुरू केला आहे. आता निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच उन्हाच्या वाढत्या पार्‍यासोबतच राजकीय वातावरण देखील तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content