ऍलर्जी असलेल्या रुग्णांवर अमेरिकेत फायजरच्या लसीचे दुष्परिणाम

 

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेत अलास्का राज्यात फायजरची कोरोना लस घेतल्यानंतर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर दुष्परिणाम झाले. त्यानंतर आता प्रशासनाने तातडीची पावले उचलत लसीकरणाबाबत निर्देश जारी केले आहेत.

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन (सीडीसी) हे निर्देश जारी केले आहेत. लसीचे गंभीर दुष्परिणाम झालेल्या कर्मचाऱ्यांना दुसरा डोस न देण्याची सूचना सीडीसीने केली आहे.

सीडीसीने सांगितले की, लस दिल्यानंतरही संबंधित व्यक्तिला एलर्जीपासून बचाव होण्यासाठी देण्यात येणारे औषध दिल्यानंतरही त्याला रुग्णालयात दाखल करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास या प्रकरणाला गंभीर दुष्परिणाम समजले जाईल. ज्यांना लसीमुळे गंभीर एलर्जी होण्याचा धोका आहे, अशांना लसीकरणापासून दूर ठेवण्याची आवश्यकता आहे.

याआधी ज्यांना कोणत्याही प्रकारच्या एलर्जीचा त्रास आहे, अशा व्यक्तिंनी लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना ‘सीडीसी’ने केली आहे. याआधी एलर्जी असलेल्या लोकांना लस देण्याबाबत कोणतीच अट, मनाई नव्हती. फायजर-बायोएनटेकची लस दिल्यानंतर दुष्परिणाम झालेल्या पाच प्रकरणांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.

मॉर्डनाच्या लशीलाही आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एलर्जीचा त्रास असलेल्यांना ही लस देण्यास मनाई करण्यात आली आहे. एलर्जीचा त्रास असलेल्या व्यक्तिंवरदेखील ही लस दुष्परिणाम करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एलर्जी नसलेल्या लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे.

अमेरिकेतील अलास्का शहरात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे दिसून आले. लस दिल्यावर काही मीनिटातच आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होऊन तब्येत खालावली होती. हे दोघेही आरोग्य कर्मचारी एकाच रुग्णालयात कार्यरत होते. लस देण्यात आलेल्या एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याला आधीपासून अॅलर्जीचा कोणताही त्रास नव्हता. लस दिल्यानंतर पहिल्या दहा मीनिटातच तिची तब्येत खालावू लागली, अशी माहिती बार्टलेट रिजनल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याने दिली.

महिलेचा चेहरा तसेच गालावर पुरळ दिसू लागले. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. काही वेळ श्वास घ्यायलाही त्रास होत होता. या महिला कर्मचाऱ्याला सर्वप्रथम अॅलर्जीवरील एपिनेफ्राइनची मात्रा देण्यात आली. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील पुरळ कमी झाले. परंतु थोड्याच वेळात पुन्हा पुरळ दिसू लागले. त्यानंतर स्टिरॉइड आणि परत एकदा एपिनेफ्राइनची मात्रा देण्यात आली. काही वेळानंतर औषधांचे ड्रिप थांबवण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा अॅलर्जी दिसून आली. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. उपचारानंतर या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

Protected Content