अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात साकारणार अधिकारी व कर्मचारी निवासस्थान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर  तालुक्यातील अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान साकारणार असून सदर बांधकामासाठी रु.१४८०.४७ लक्ष (चौदा कोटी ऐशी लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतक्या रक्कमचे अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनाने दिली आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे ही मान्यता मिळाली असून यामुळे डॉक्टर व अधिकाऱ्यांची निवासाची सोय होणार असल्याने रुग्णसेवेसाठी 24 तास संपूर्ण स्टाफ उपलब्ध होणार आहे. सदर अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंमळनेर यांनी तयार केले आहेत.दरम्यान सदर रुग्णालयातील डॉक्टर व अधिकारी वर्गाच्या निवासस्थानाची काही वर्षांपूर्वी पुरामुळे दुरावस्था झाल्याने डॉक्टर व कर्मचारी येथे निवासी राहत नव्हते. त्यामुळे रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांची गौरसोय होत होती परिणामी रुग्णांना थेट अमळनेर येथे जावे लागत होते ही बाब मंत्री अनिल पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शासन दरबारी निवासस्थान इमारतीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन लोकसभा निवडणुकीची आचार संहिता जाहीर होण्याच्या एक दिवस आधी या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून या मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार, आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन, पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Protected Content