…आणि कोर्टाच्या आवारातच मुलाच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न हुकला !

जळगाव, जितेंद्र कोतवाल | नशिराबाद येथे आपल्या मुलाचा खून करणार्‍याला थेट कोर्टाच्या आवारात गोळ्या घालून खून करण्याचा प्रयत्न आज उधळण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी नशिराबाद जवळच्या उड्डाण पुलाच्या खाली भीषण हत्या झाली होती. यात तुरूंगातून सुटलेल्या मुलाला दुचाकीवर घरी घेऊन येणार्‍या बाप या दोघांवर हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यात हल्लेखोरांनी गोळीबारासह चॉपरचा हल्ला करून धम्मप्रिया मनोहर सुरळकर याला ठार केले. तर त्याचे वडील मनोहर सुरळकर हे गंभीर जखमी झाले होते. या खूनाला पूर्व वैमनस्याची किनार होती. धम्मप्रिया सुरळकर हा भुसावळात ११ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मोहंमद कैफ शेख शाकीर याच्या खून खटल्यातील आरोपी होता. तो अकरा महिन्यांपासून कारागृहात होता. तो कारागृहात गेल्यापासूनच मयत मोहंमद कैफचे भाऊ व वडील बदल्याच्या भावनेत जळत होते. अखेर जामीन मिळताच त्याच दिवशी हल्ला करून धम्माप्रियाला संपविण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणी शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-२१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय-२१) दोन्ही रा. पंचशिल नगर, भुसावळ या दोघांना अटक करण्यात आली होती. Livetrends News अटक झाल्यापासून ते कारागृहातच होते. आज या खटल्याची तारीख असून त्यांना सकाळी सुमारे अकराच्या सुमारास कोर्टात आणणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणात मयत धम्मप्रियाचे वडील मनोहर खैरनार हे सूडाच्या आगीत जळत होते. त्यांनी आपल्या मुलाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी थेट कोर्टाच्या आवारातच दोन्ही आरोपींवर गोळीबार करून त्यांना संपविण्याचा कट रचला. यासाठी तो सुरेश रवी इंधाटे यांच्यासह कोर्टाच्या परिसरात दबा धरून बसला. मनोहर खैरनार आणि सुरेश इंधाटे हे दोन्ही बुरखा घालून मुस्लीम महिलांच्या पेहरावात कोर्ट परिसरातल्या मंदिराजवळ बसले होते.

दरम्यान, मंदिराच्या जवळ बसलेल्या या मुस्लीम पेहरावातील दोघांना पाहून पोलिसांच्या एका खबर्‍याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकाला दिला. यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी धाडसी कारवाई करत पथकाने या दोघांना अटक केली. या प्रसंगी झालेल्या झटापटीत मनोहर खैरनार याला अटक करण्यात आली असली तरी सुरेश रवी इंधाटे याने तेथून पलायन केले. खैरनारची झडती घेतली असता त्याच्याकडे पर्स आढळून आली. यात एक गावठी पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुस आढळून आले. आपण आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहर खैरनारने दिली आहे. अर्थात, शहर पोलिसांच्या पथकामुळे त्याचा डाव उधळून लावण्यात आला. याप्रसंग सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी शहर पोलीस ठाण्यात येवून चौकशीला सुरूवात केली आहे.

Protected Content