जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

अलीकडेच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांनी विजयसंपादन केला होता. विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करून धनखड विजयी ठरले.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली होती. यानंतर त्यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा कार्यभारी स्वीकारला.

धनखड यांनी जनता दलातून राजकारणाला सुरुवात केली. धनखड १९८९ मध्ये झुंझुनूमधून खासदार झाले. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावरच १९८९ ते १९९१ या काळात व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीही करण्यात आले होते.मात्र, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्ष सोडला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९९३ मध्ये अजमेरमधील किशनगडमधून कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. २००३ मध्ये त्यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये जगदीप धनखड यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले.

Protected Content