Home Cities यावल यावलमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव ; ABC सेंटर सुरू करण्याची नगरसेविका कल्पना...

यावलमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव ; ABC सेंटर सुरू करण्याची नगरसेविका कल्पना वाणी यांची मागणी

0
9

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका कल्पना दिलीप वाणी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना लेखी निवेदन देत शहरात Animal Birth Control (ABC) सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे.

नगरसेविका कल्पना वाणी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून यावल शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर आणि वस्ती भागात कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात कुत्रे चावण्याच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, नगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी आणि मानवीय उपाय म्हणून नगरपालिकेमार्फत तातडीने ABC (Animal Birth Control) सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची नसबंदी (Sterilization), रेबीज प्रतिबंधक लसीकरण (Anti-Rabies Vaccination) आणि शासनाच्या नियमांनुसार त्यांचे व्यवस्थापन करण्यात आल्यास भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगरसेविका कल्पना वाणी यांनी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या समस्येवर नगरपालिकेने दीर्घकालीन नियोजन करून प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound