मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर–मलकापूर मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालकाच्या निष्काळजीपणाचा प्रकार समोर आल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बस चालवित असताना चालक मोबाईल फोनवर वारंवार बोलत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून, हा प्रकार प्रवाशांच्या जीविताशी खेळ करणारा असल्याचे सांगत संबंधित चालकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१३-सीयू-६९३१ क्रमांकाची एसटी बस मुक्ताईनगर–मलकापूर मार्गावर धावत असताना चालक मोबाईलवर संभाषण करत असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. बस चालविताना एका हाताने स्टेअरिंग पकडून दुसऱ्या हाताने मोबाईलवर बोलण्याचा प्रकार सुरू असल्याने बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे हे वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन असून, अशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, संबंधित घटनेचे चित्रीकरण एका प्रवाशाने मोबाईलमध्ये केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पुरावा म्हणून एसटी महामंडळाच्या संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओ आणि अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

प्रवाशांनी संबंधित आगार प्रशासन, विभागीय नियंत्रक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. चालकाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एसटी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही नागरिकांनी म्हटले आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा ही लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित आहे. त्यामुळे चालकांकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालणे गरजेचे आहे. आता या गंभीर प्रकाराची एसटी महामंडळ प्रशासन कितपत दखल घेते आणि संबंधित चालकावर कोणती कारवाई केली जाते, याकडे मुक्ताईनगर तालुक्यातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.



