युती केली ही फार मोठी चूक झाली- फडणवीस

मुंबई । गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली युती ही मोठी चूक होती. अन्यथा भाजप स्वबळावर १५० जागांच्या पार गेला असता अशी खंत आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ते भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीस संबोधित करतांना बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती केली हीच चूक झाली नाहीतर भाजपाला १५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आधीच याबाबत केलेली भाकिते ही खरी ठरल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्ये सांगितलं होतं की भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर संपूर्ण बहुमत २७२+ जागा भाजपाला मिळतील. त्यावेळी भाऊ तोरसेकर अशक्य वाटणारा अंदाज बांधत आहेत असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांचं ते भाकित खरं ठरलं. २०१९ मध्येही काहिशी अस्थिरता होती. त्यावेळीही भाऊ म्हणाले होते की ३००+ जागा येतील. लोकसभा निवडणुकीत तेच घडलं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी भाजपा स्वबळावर १५०+ जागा जिंकेल. किंवा युती केल्यास दोन्ही पक्षांना मिळून २००+ जागा मिळतील असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय निवडला नसता तर तोरसेकर यांचं तिसरं भाकित खरं ठरलं असतं. आपण मोदींच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात १५०+ जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली असल्याची खंत फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Protected Content