जालन्यात आयटी खात्याचे छापे : ३९० कोटींचे घबाड गवसले !

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जालन्यातील स्टील व्यावसायिकांवर रात्री उशीरापर्यंत इन्कम टॅक्स खात्याच्या पथकाने मारलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ३९० कोटी रूपयांचे घबाड गवसल्याने खळबळ उडाली आहे.

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने दिनांक १ ऑगस्टपासून या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. काल रात्री उशीरापर्यंत ही कारवाई आटोपल्यानंतर इन्कम टॅक्स खात्याने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे या कारवाईचा कुणालाही सुगावा लागू नये म्हणून ही सर्व पथके दुल्हन हम ले जायेंगे असे स्टीकर्स चिपकावलेल्या वाहनांमधून आले होते. अर्थात, विवाहाचा ताफा दाखवून आयटी खात्याच्या अधिकार्‍यांनी छापेमारी केली.

यात चार स्टील कारखानदारांसह कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांसह कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. यात तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. यात ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. या छाप्यांमध्ये औरंगाबाद येथील एका व्यावसिकावर देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content