मराठवाड्यासाठीच्या पाणी योजना बंद केल्यास मोठा लढा लढू – फडणवीस

औरंगाबाद, वृत्तसंस्था | फडणवीस सरकारच्या अनेक योजनांचा आढावा घेऊन त्यातील अनेक योजना बंद करण्याचा निर्णय सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासाठी आमच्या सरकारने आणलेल्या पाणी योजना बंद करु नयेत. जर या योजना बंद झाल्या तर मोठी लढाई लढू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “मराठवाड्यात सर्वांत मोठा पाण्याचा प्रश्न आहे. यामध्ये सिंचनासाठी, पिण्यासाठीच्या पाण्याचा मोठा अनुशेष आहे. सिंचनासाठी पाणी नसल्याने इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. म्हणूनच आमचे सरकार आल्यानंतर मराठवाड्यावर आम्ही विशेष लक्ष दिले. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. मात्र, यापूर्वीच्या आघाडी सरकारने मराठवाडाच्या हिश्याचे पाणी पळवून नेले होते. त्यामुळे कृष्णा मराठवाडा योजनेचे पाणी मराठवाड्याला मिळाले नाही.” ‘जलयुक्त शिवार’ बंद करु नका “उलट आमच्या सरकारने कृष्णा मराठवाडा योजनेसाठी ४००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे हे पाणी बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात येणार आहे, मात्र ते या सरकारमुळे बंद होणार असल्याची शंका आम्हाला आहे, त्यामुळेच पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. मराठवाड्याचे हे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केल्यास मराठवाडा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला या योजनेचे श्रेय घ्यायचे असेल तर घ्या, त्याचे नाव बदलायचे असेल तर बदला, पण जनतेच्या मनातली ‘जलयुक्त शिवार योजना’ बंद करु नका. पाच वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून मराठवाड्यात आम्ही पाणीक्रांती आणली. त्यामुळे ही योजना बंद केलीत तर मोठी लढाई लढू,” असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी सरकारला दिला. आघाडी सरकारने नवी धरणे बांधली नाहीत “गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्याला १०२ टीएमसी पाणी मिळाले होते. मात्र, आघाडी सरकारने नवी धरणे बांधण्याला स्थगिती दिली. आघाडीच्या काळात मराठवाड्यावर अन्याय झाला. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Protected Content