मोदींच्या ‘पायधुणी’वर शिवसेनेचा निशाणा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

मुंबई । पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराज येथे सफाई कर्मचार्‍यांचे पाय धुण्याचा प्रकार शिवसेनेला आवडलेला नसून या पायधुणीवर आज निशाणा साधण्यात आला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातून आज पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. राजकीय पायधुणी या शीर्षकाखालील अग्रलेखातून मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, निवडणुकांची चाहूल लागली आहे. असेही म्हणता येईल की, दरवाजावर टकटक करून निवडणुकांचे वारे आत घुसले आहेत. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केले, म्हणजे डुबकी मारली. पंतप्रधानांनी गंगेत डुबकी मारली व नंतर सफाई कामगारांचे पाय धुऊन करसेवा केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. पंतप्रधान सफाई कामगारांचे पाय धूत आहेत, पंतप्रधानांनी भगवी वस्त्रे परिधान करून कपाळावर चंदन, भस्म वगैरे लावल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. हे सर्व नेहमीच ठरवून केले जाते व त्याचे राजकीय रंग-तरंग उमटत असतात. २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधानांनी केसरी पगडी परिधान करून हिंदुत्ववादी मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तीन राज्यांत भाजपचा पराभव झाला व ही सर्व राज्ये परंपरेने हिंदुत्ववादी होती. पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराजला जाऊन कुंभस्नान करणे किंवा दलितांचे पाय धुणे (चरणतीर्थ) यात गैर काय? त्याचा कुणी राजकीय संबंध लावू नये. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, मायावती यांच्यासारख्या वंचितांच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या करसेवेवर अद्यापि भाष्य केले नाही. कारण त्यांची विवंचना वेगळी आहे. राजकारणातील ही पायधुणी सुरूच असते. आज प्रियांका किंवा राहुल गांधी तरी काय करीत आहेत? चिरंजीव राहुल तर अचानक सौम्य हिंदुत्ववादी बनले व काल तर सोवळे नेसून तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेले. सोवळ्यात चालताना ते अडखळत होते, गांगरत होते, पण हे महाशय अयोध्येत राममंदिर व्हावे यावर बोलत नाहीत. विरोधी महाआघाडीतील कॉम्रेड सीताराम येचुरी, शरद पवार, केजरीवाल वगैरे तथाकथित सेक्युलर मंडळींनीदेखील गंगेत ङ्गडुबकीफ मारायला काहीच हरकत नाही.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, आता पंतप्रधानांनी गंगाकिनारी सफाई कामगारांचे पाय धुतले. याबद्दल अभिनंदन, पण सफाई कामगारांचे प्रश्‍न पायाचे नसून पोटाचे आहेत. डिजिटल इंडियात ही पायधुणी आली कोठून? ज्यांचे पाय धुतले ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत, देशातील जातीयवादी उन्माद गंगार्पण व्हावा हे पायधुणीतून झाले तरी पंतप्रधानांची करसेवा सत्कारणी लागेल असा सल्लादेखील यात देण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content