मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील भंगार साहित्य शासन नियमबाह्य पद्धतीने विक्रीस काढल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित तक्रारदाराने मुक्ताईनगर तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली असून, योग्य कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अभियंत्यांनी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविल्याशिवाय, तसेच कुठलीही सार्वजनिक नोटीस न देता आणि शासनाच्या नियमानुसार लिलाव प्रक्रिया न करता, थेट स्वतःच्या निर्णयावरून विभागातील जुने व महत्त्वाचे साहित्य विक्रीस काढले. यामुळे शासनाच्या नियमानुसार संपत्तीच्या विक्रीत पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी जरी ही विक्री पारदर्शक पद्धतीने झाली असल्याचा दावा करत १३५० किलो भंगार असल्याची माहिती दिली असली, तरी प्रत्यक्षात भंगाराचे प्रमाण यापेक्षा अधिक असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय निर्माण होतो.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच यामध्ये प्रशासनाने त्वरित आणि पारदर्शक भूमिका घेतली नाही, तर जनतेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्वरित या प्रकरणाची गंभीर दखल घेणे आवश्यक ठरत आहे.