मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात सध्या सुरू असलेल्या गटारी व पाणीपुरवठा पाइपलाईन टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्यात खोदलेले रस्ते, ठिकठिकाणी साचलेले पाणी, चिखल आणि त्यातून निर्माण झालेली वाहतूक अडचण यामुळे शहरवासीयांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर सध्या पाइपलाईन व गटारीसाठी खोदकाम सुरू आहे. मात्र, या कामांनंतर रस्त्याचे पूर्ववत डागडुजीचे काम ठेकेदाराकडून करून घेण्याची जबाबदारी असलेल्या नगरपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचत असून, जागोजागी पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत.
या असुविधेमुळे शाळेतील लहान मुले, तरुण, महिला व वयोवृद्ध नागरिकांना चालताना मोठ्या अडचणी येत आहेत. वाहनचालक विशेषतः दुचाकीस्वारांना चिखलात घसरून अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांत अशा अपघातांमध्ये अनेक जण किरकोळ जखमी झाल्याचेही समजते.
स्थानिक नागरिकांच्या मते, सार्वजनिक कामे करणे आवश्यक असले तरी त्यानंतर रस्ते दुरुस्ती करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता नगरपंचायत जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, सोशल मीडियावरूनही प्रशासनावर टीका सुरू झाली आहे. शहरवासीयांकडून जोरदार मागणी केली जात आहे की, खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत आणि पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना आळा घालावा. अन्यथा संतप्त नागरिक आंदोलनाचा मार्ग पत्करू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.