यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या दहिगाव येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने यात्रोत्सव साजरा होणार आहे. यावेळी तब्बल अकरा क्विंटल साबुदाणा फराळ, तसेच केळी व चहा वाटप करण्यात येणार असून, हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत.
या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, गेली दीडशे वर्षे हे ठिकाण भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. सन १९९८ मध्ये सुमारे २५ लाख रुपये खर्चून भव्य मंदिर उभारण्यात आले होते. त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य हेमराज महाजन, दिवंगत धागो पाटील, प्रकाश सोनार, आत्माराम महाजन आणि गावातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी मोठे योगदान दिले होते.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य यात्रा आयोजित केली जात आहे. पहाटे पाच वाजल्यापासून श्री विठ्ठल-रुक्माई यांची पूजा अर्चा आणि होम पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजनाची खास बाब म्हणजे, नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते पूजन होणार आहे. या पूजनासाठी संगीता-तुषार माळी, धनश्री-गौरव पाटील, दिपाली-अक्षय रत्नपारखी, सपना-अविनाश पाटील, आश्विनी-सचिन मगरे आणि निकिता-मयूर पवार ही युगुले सहभागी होणार आहेत.
मंदिर सजावटीसाठी सागर चौधरी, बंटी पाटील, शैलेंद्र पाटील आणि ट्रस्टचे सचिव कैलास पाटील विशेष मेहनत घेत आहेत. यात्रा काळात परिसर केवळ धार्मिकतेने भरून जाणार नाही, तर सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडणार आहे. अनेक सेवाभावी संस्था या निमित्ताने केळी वाटप, चहा सेवा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करणार आहेत.
जळगाव तालुका, यावल परिसर तसेच पंचक्रोशीतील गावांमधून हजारो भाविक दरवर्षी येथे दाखल होतात. दिवसभर भजने, भारुड, कीर्तनाने परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघतो. या पवित्र दिवशी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पाटील व दहिगाव येथील हरिभक्त परायण भजनी मंडळींनी केले आहे.