दुबई– प्रियम गर्गची उत्तम खेळी आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादनं चेन्नईवर मात केली. चेन्नई संघाचा हा लागोपाठ तिसरा पराभव ठरला आहे.
आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्सला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजीपासून चांगली सुरुवात केली. सलामीवीर जॉन बॅरिएस्टोला दीपक चहरनं शून्यावर माघारी धाडलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेनं ४६ फटकेबाजी सुरु केली. मात्र पांडेला २९ धावांवर शार्दुल ठाकूरनं बाद केलं. यानंतर ११ व्या षटकात वॉर्नर आणि केन विल्यमसन लागोपाठच्या चेंडूंवर माघारी परतले.
यानंतर प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मानं पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागिदारी रचली. गर्गनं २६ चेंडूंत ५१ धावांची नाबाद खेळी केली. त्याला शर्मानं २४ चेंडूंत ३१ धावा काढून चांगली साथ दिली. चेन्नईकडून दीपक चहारनं २ फलंदाजांना बाद केलं. तर शार्दुल ठाकूर आणि पियूष चावलानं प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. हैदराबादनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन, अंबाती रायडू, केदार जाधव पटकन बॅड झाले. तर सलामीवीर फॅफ ड्युप्लीसीस २२ धावा काढून माघारी परतला. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजानं पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी रचली. जाडेजानं ३५ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. मात्र फटकेबाजी करताना तो बाद झाला. धोनीनं मोठे फटके मारण्यास सुरुवात केली तेव्हा उशिरा झाला होता. धोनी ३६ चेंडूंत ४७ धावा काढून नाबाद राहिला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १५७ धावाच करता आल्या. यामुळे सनरायझर्स हैदराबादनं चेन्नईवर ७ धावांनी विजय मिळवला.