शारजा- शारजा येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जवर १६ धावांनी मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेलं २१७ धावांचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. २० षटकांत चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला.
नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वालला स्वस्तात माघारी धाडत चेन्नईने चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर मैदानावर आलेल्या संजू सॅमसनने स्टिव्ह स्मिथच्या साथीने चेन्नईच्या गोलंदाजीची धुलाई केली. सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. परंतू अखेरच्या षटकांत तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने २०० धावांचा टप्पा ओलांडला. सॅमसनने ३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांसह ७४ धावा केल्या. स्मिथनेही ६९ धावा करत कर्णधारपदाची जबाबदारी निभावली. चेन्नईकडून सॅम करनने ३, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
वॉटसन आणि डु-प्लेसिस या जोडीने डावाची सुरुवात चांगली केली होती. परंतू वॉटसन माघारी परतल्यानंतर चेन्नईचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. फाफ डु-प्लेसिसने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचे प्रयत्न तोकडेच पडले. डु-प्लेसिसने ७२ धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने ३, आर्चर-गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.