राहूल गांधी आणि ‘त्या’ २३ नेत्यांमधील संघर्ष चव्हाट्यावर

नवी दिल्ली । काँग्रेसला नवीन नेतृत्वाची मागणी करणार्‍या २३ नेत्यांवर राहूल गांधी यांनी आजच्या कार्यकारिणीच्या सभेत जोरदार हल्लाबोल केला आहे. तर पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. यामुळे आता काँग्रेसमधील कलह कोणत्या पातळीवर जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्‍या २३ नेत्यांवर काँग्रेस खासदार राहुल गांधी नाराज असून त्यांनी ही नाराजी आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीतून बोलून दाखविली आहे. इच्छा नसतानाही सोनिया गांधी काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं. त्या रुग्णालयात असताना प्रश्‍न उपस्थित करणं किती योग्य आहे?, अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी सवाल विचारले. या पत्रामुळे २३ नेते भाजपसोबत एकप्रकारे हातमिळवणी करत असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी प्रश्‍न विचारल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट ट्वीट करुनच त्यांना उत्तर दिलं. कपिल सिब्बल यांनी लिहिलं आहे की, राहुल गांधी म्हणतात आम्ही भाजपला मदत करतोय. राजस्थान हायकोर्टात काँग्रेसची बाजू मांडली. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पक्षाला मदत केली. मागील तीन वर्षात कोणत्याही विषयावर भाजपच्या बाजूने वक्तव्य केलं नाही. तरीही आम्ही भाजपला मदत करतोय!

दरम्यान, भाजपशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप सिद्ध झाला तर राजीनामा देईन, असा पवित्रा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी घेतला आहे. या सर्व गदारोळात कपिल सिब्बल यांच्या ट्वीटला काँग्रसेचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना अशाप्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मीडियातील चुकीच्या वृत्ताने आणि माहितीने दिशाभूल होऊ नका, असं सुरजेवाला म्हणाले.

त्यांनी लिहिलं आहे की, राहुल गांधी यांनी अशा आशयाचा कोणताही शब्द उच्चारला नाही किंवा संगनमत केल्याचंही म्हटलेलं नाही. मीडियात पसरलेल्या चुकीच्या वृत्त आणि माहितीने दिशाभूल होऊ नका. पण हो, एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा आणि दुखावण्यापेक्षा आपल्याला एकत्र येऊन मोदींच्या राजवटीविरुद्ध लढण्याचं काम केलं पाहिजे.

Protected Content