एक बाटली झाडासाठी : जळगावकरांनो नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हा !

जळगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या कडाक्याच्या उन्हाळ्यात किमान एक पाण्याच्या बाटलीने जगविण्याच्या हेतूने जळगावात आजपासून उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सकाळी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत याला प्रारंभ करण्यात आला.

सध्या कडाक्याच्या उष्णतेने संपूर्ण जळगावकर त्रस्त झालेले आहेत. दरवर्षी तापमानात वाढ होत असून उन्हाळा आला की, सर्वांना पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आठवते. मात्र यावर उपाययोजना म्हणून कुणी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. या पार्श्‍वभूमिवर, ज्येष्ठ पत्रकार तथा, एबीपी-माझा वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी तसेच वृक्ष संवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे यांनी पुढाकार घेऊन एक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली आहे. त्यांनी स्त्री शक्ती-सरस्वती फाऊंडेशनच्या मदतीने झाडांसाठी पाणपोई हा उपक्रम अंमलात आणला आहे. यात तीन चाकी सायकलवरील एका टँकच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांना पाणी दिले जाणार आहे. अर्थात यासाठी कोणतेही वाहन वापरण्यात आले नसून पर्यावरणानुकुल पध्दतीत वृक्षांना जीवदान दिले जाणार आहे. याच्या जोडीला एक बाटली झाडासाठी हा उपक्रमदेखील राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत कुणीही त्या व्यक्तीचा परिसर, कार्यालय अथवा रस्त्यावरील झाडाला शक्य असेल तेव्हा एक प्लास्टीकची बाटली भरून पाणी देऊ शकतो. आपल्यासाठी एक बाटली पाणी ही फार मोठी बाब नसली तरी एखाद्या झाडाला हेच पाणी कडाक्याच्या उन्हातून वाचवू शकते. हा यामागील विचार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव शहरातील किमान दहा हजार तरी झाडांना जीवदान मिळावे अशी अपेक्षा आहे.

आज सकाळी मोहाडी रोडवरील लांडोरखोरी उद्यानाजवळ असणार्‍या संत बाबा गेलारामजी कुटीया येथे या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना या उपक्रमास प्रारंभ केला. यावेळी आपल्या मनोगतातून जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. तर चंद्रशेखर नेवे यांनी आपल्या मनोगतातून जळगावात सर्व वृक्षमित्रांनी यात सहभागी होऊन ही एक लोक चळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्यासह डॉ. महेंद्र काबरा, आनंद मलारा, निर्मिती फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सपके, स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठानचे किरण पातोंडेकर, प्रमोद विसपुते, सुनील सोनार आदींसह वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमात जळगावकरांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. या संदर्भात अधिक माहितीसाठी वृक्ष संवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे यांच्याशी (८२७५५१९६५९ ) या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकतात.

Add Comment

Protected Content