लक्ष्मीनगरातील नाथवाड्यात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मी नगरातील नाथ वाड्यामध्ये चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोने- चांदीचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ५५ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज इस्माईल तडवी (वय-६०) रा. लक्ष्मी नगर, नाथ वाडा जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सर्फराज हे काही कामानिमित्त १६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यान, या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून त्यांच्या घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्याची व चांदीचे दागिने रोकड आणि मोबाईल असा एकूण १ लाख ५५ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान सर्फराज तडवी हे शुक्रवार २२ जुलै रोजी दुपारी दीड वाजता घरी आले. त्यावेळेस त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कठोरे करीत आहे.

Protected Content