यश मिळविण्यासाठी मुलांमधील उपजत गुणांना प्रोत्साहन द्यावे- डॉ. केतकीताई पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत, कष्ट करण्याची तयारी, विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावे. त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी, उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात प्रावीण्य मिळविण्यात मदत करावी. म्हणजे वेळ वाया जात नाही. विद्यार्थ्यांवर जबरदस्ती होत नाही. कोणालाही नैराश्य येणार नाही, असे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका केतकीताई पाटील यांनी केले.

किरण नाईकवाडी लिखित “सुसंवाद : मुलं आणी पालकांमधील” या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केतकी पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरीचे संचालक व  हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, भुसावळचे प्रांत जितेंद्र पाटील, मुक्ताईनगरचे तहसीलदार श्रीनिकेतन वाडे, लेखक किरण नाईकवाडी, भुसावळच्या नायब तहसीलदार प्रीती लुटे उपस्थित होते.

प्रस्तावनेतून राहुल गायकवाड यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाविषयीं सविस्तर माहिती दिली. तर लेखक किरण नाईकवाडी यांनी, पुस्तक लिहिण्यामागील भूमिका स्पष्ट केली. पालक व मुलांमधील संवाद हरपत् चालला असून तो उत्तम कसा होईल व  त्यादवारे पारिवारीक स्वास्थ्य चांगले कसे राहील याचा विचार पुस्तकलेखनात केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते “सुसंवाद : मुलं आणी पालकांमधील” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यानंतर डॉ. वैभव पाटील, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी मनोगतातून सदिच्छा दिल्या. अध्यक्षस्थानावरून केतकी पाटील यांनी सांगितले की, पालकांनी पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. त्याच्या पातळीवर जाऊन, त्याचे मित्र होऊन त्याची आवड, कल जाणून घ्यावा. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते गुरू-शिष्याचेच असावे. शिक्षकांचा आदर केलाच पाहिजे, ही शिकवण त्याला मिळाली पाहिजे. त्याच वेळी शिक्षकांनी ही काळजी घ्यावी की, एखाद्या कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा अपमान होणार नाही. यामुळे प्रेमाचे, आदराचे, आपुलकीचे नाते आपोआप तयार होईल, असेही केतकी पाटील म्हणाल्या.

सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार हितेंद्र धांडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी चंदन कोल्हे, विलास बोरसे आदिनी परिश्रम घेतले.

Protected Content