भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंना अंतरीम जामीन

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल केलेल्या खटल्यात आमदार एकनाथराव खडसे यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने दाखल गुन्ह्यात खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे प्रदीर्घ काळ कारागृहात होते. त्यांना अलीकडेच जामीन मिळाला आहे. तर, याच प्रकरणात खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवतींची चौकशी झाली असून त्यांना जामीन मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर याच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खाते म्हणजेच एसीबीने नव्याने गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा म्हणून एकनाथ खडसे यांनी पुणे येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर त्यांना न्या. पी. पी. जाधव यांच्या कोर्टाने अंतरीम जामीन दिला. आता या प्रकरणी ३ जानेवारी २०२४ रोजी सुनावणी होणार आहे. अर्थात, न्यायालयाच्या निकालामुळे एकनाथराव खडसे यांना तूर्तास दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content