जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उद्योग आणि विद्यापीठ आंतर संवाद उपक्रमांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत आठ उद्योग समुहांच्या अधिकाऱ्यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र प्रशाळेत या आंतरसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठात प्रारंभापासून पारंपारिक अभ्यासक्रम सुरु न करता रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करण्यात आल्याची आठवण देत विद्यापीठ आणि समाज व उद्योग यांच्या संवाद ठेवण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग समुहांनी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन प्रा. माहेश्वरी यांनी केले. मास टेक कंट्रोल प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक सुभाष पाटील यांनी यावेळी बोलतांना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर एक ते दोन वर्ष इंडस्ट्री मध्ये काम करावे. इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांचा अवश्य विचार केला जाईल असे ते म्हणाले. सातपुडा अॅटोचे संचालक किरण बच्छाव यांनी ऑटोमोबाईल उद्योगात दर तीन वर्षांनी नवनवीन बदल घडत आहेत. मोठी आव्हाने उभी आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावे असे सांगून विद्यार्थ्यांन इंटर्नशिप देण्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी संचालक प्रा. जयदीप साळी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जसपाल बंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. डी.जी. शिरोळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल इंडस्ट्रीज जळगावचे चेतन चावरीया, नरेंद्र वाघ तसेच मास टेक कंट्रोलचे डी.ओ. चौधरी, एस.एन. पाटील, सुधीर चौधरी, जैन इरिगेशनचे संजय फडणीस, माऊली सोलार, जळगावचे सतिष पाटील व हितेंद्र पाटील, सुदर्शनचे सोलारचे चंद्रशेखर महाजन व सचिन सोनवणे, सातपुडाचे कुणाल मराठे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.