


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील औद्योगिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष काम करण्याचा सराव मिळावा आणि शिक्षण व उद्योग क्षेत्रातील अंतर कमी व्हावे, या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे तीन दिवसीय ‘इंडस्ट्रियल अॅप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या या विशेष उपक्रमास नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास केंद्राचे मोलाचे सहकार्य लाभले.
या तीन दिवसीय प्रत्यक्ष कृतीसह सराव कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कोअर इलेक्ट्रॉनिक्स, विविध इलेक्ट्रॉनिक घटक, सेमीकंडक्टर उपकरणे, पॉवर इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल्स, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिकल मशीन, आयसीएस, मायक्रोकंट्रोलर तसेच आधुनिक औद्योगिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सखोल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विविध इलेक्ट्रॉनिक घटक हाताळणे, सर्किटची अंमलबजावणी करणे, उपकरणांची अचूक ओळख पटवणे, त्यांचे औद्योगिक उपयोग समजून घेणे आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आत्मसात केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील तांत्रिक संकल्पनांचा प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणात कसा वापर केला जातो, हे स्पष्टपणे समजण्यास मदत झाली. उद्योगाभिमुख तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यासोबतच आधुनिक उद्योगांच्या वाढत्या गरजांनुसार व्यावहारिक कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढण्यास या कार्यशाळेने महत्त्वपूर्ण हातभार लावला. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. सचिन महेश्री यांनी या संपूर्ण उपक्रमाच्या नियोजन व आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री यादव यांनी केले, तर विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. महेश एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी संपूर्ण कार्यशाळेस मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य पुरवले.
या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजश्री यादव, कृष्णा पाथोड, आदित्य पवार, उर्वशी पाटील, सोनम गुरिजाल, अंजली जोगी, श्रेयोनी चोपडे, दिव्या फाके, प्रगती चौरे, हर्षल खरचे, ओम राणे, ओम इचलकर, चेतन माळी, तेजस्विनी उगले, दीपिका परदेशी, कल्याणी शिंदे आणि तन्मय पाटील या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थी, प्राध्यापक व आयोजकांचे कौतुक केले.



