यावल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसनिमित्त उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भालोद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख व रासेयोचे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. एच. पाटील होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या. कार्यक्रमात उपप्राचार्य ए. पी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी‌. कापडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमात बहुसंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.

उद्बोधन वर्गात प्रारंभी प्रास्ताविकात कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी. पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे महत्त्व व भूमिका विशद केली. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, राष्ट्रीय सेवा योजना ही एक देशव्यापी चळवळ व विचारधारा आहे.भारत देश हा युवकांचा व तरुणांचा देश आहे. युवा वर्ग हा देशाचा आधारस्तंभ असतो. युवा पिढीवर संस्कार केले तर युवक संस्कारित होऊन त्याचा व्यक्तिमत्व विकास होईल व अप्रत्यक्षपणे देशाचा विकास होईल असे मार्गदर्शनपर केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी प्रतिपादन केले की राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवकात मूल्यशिक्षण रुजवले जाते. प्रभावी व्यक्तिमत्व तयार होऊन सर्वांगीण विकास होत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा समाजाच्या व राष्ट्राच्या सेवेसाठी अष्ट प्रहर बांधील आहे. यावेळी स्वयंसेवक तेजश्री कोलते (एफ. वाय. बी. ए. ) हिनेही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पाटील हिने केले तर आभार स्वप्नाली कोळी हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. एच. जी. भंगाळे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधा खराटे, नरेंद्र पाटील, सी. टी. वसावे, प्रमोद कदम, अमृत पाटील, संतोष ठाकूर, अनिल पाटील, प्रमोद जोहरे, प्रमोद भोईटे, नवमेश तायडे, सचिन बारी, देवेंद्र बारी, सुचिता बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content