सातपुड्याच्या पायथ्याशी रंगला होळी लोक महोत्सव

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नागादेवी येथे १२ व १३ मार्च रोजी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होळी लोक महोत्सवात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले.

या महोत्सवात सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अनेक गाव/पाड्यांमधुन आदिवासी बांधवांनी उपस्थित राहुन आदिवासी ढोल वाजवण्याच्या स्पर्धेतत एकुण २२ ढोल वादकांनी सहभाग घेतला. होळी पेटवुन होळीच्या आजुबाजुला ढोलाच्या तालावर सर्व बांधवांनी जल्लोष करत ठेका धरला. या स्पर्धेत सहभागींमधुन विजेते निवडले गेले. कुड्यांपाणी ता.चोपडा या गावाने प्रथम पारितोषिक रुपये २००० पटकावले; द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रु.१५०० धामण्या या गावानेतर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रु.१००० लसणीबर्डी या गावाने पटकावले.प्रसंगी १३ मार्च सकाळी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी यावल प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले ,यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व जिल्हा समन्वयक वनांचल समृद्धी अभियान शुभम नेवे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यायला हवे.शिक्षणामुळे आपल्या जिवनात अमुलाग्र बदल घडून येतात व आपली येणारी पिढी आयुष्यात यशस्वीपणे नोकरी-व्यवसाय करु शकेल.सोबतच आपण ज्या जंगलात राहतो त्या जंगलाचे संरक्षण व संवर्धनही आपण करायला हवे या कामात वनांचल समृद्धी अभियान सारख्या सामाजिक संस्थेची मदत आपण घेऊ शकतो.जंगलात मिळणार्‍या गौण वनउपज च्या माध्यमातून देखील आपण आपला रोजगार भागवू शकतो व मनरेगा सारख्या योजनेच्या माध्यमातून देखील गावातल्या गावात काम मिळवून आपण रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करु शकतो, असे मनोगत प्रांत अधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त केले. अरुण धनवडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की,आपण राहत असलेल्या जंगलात शुध्द हवा, पाणी व अन्न मिळते जे शहरात मिळत नाही त्यामुळे आपण या जंगलाचे मालक आहात हे जंगल तुमचे असुन या जंगलाचे रक्षण करण्याची जबाबदारी देखील तुमची आहे,त्याच बरोबर आपणास कोणी त्रास देत असेल किंवा आपल्या जंगलाचा कोणी ऱ्हास करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात मी आपणास नेहमीच मदत करण्यासाठी तत्पर असेल असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नरत रहायला हवे असेही ते म्हणाले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील हरसिंग जाया बारेला,वालु सोनारसिंग,गुमान खजान पावरा, दिनेश बारेला तालुका समन्वयक वसा, सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.

Protected Content