कॅनडात भारतीय तरूणांची गोळी झाडून हत्या

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय नागरिकांची परदेशात हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. आता कॅनडात पुन्हा एकदा भारतीय तरुणाची हत्या झाली आहे. त्याला नुकतंच कॅनेडियन परमनंट रेसिडेंट दर्जा मिळाला होता. पंजाबमधील लुधियाना येथील भारतीय वंशाच्या व्यक्तीची शुक्रवारी कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पीडित युवराज गोयल २०१९ मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडामध्ये आला होता आणि तो नुकताच कॅनडाचा कायमस्वरुपी रहिवासी झाला होता.

२८ वर्षीय युवराज सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील राजेश गोयल सरपण व्यवसाय करतात, तर आई शकुन गोयल गृहिणी आहेत. रॉयल कॅनेडियन पोलिसांनी सांगितले की , युवराजचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि त्याच्या हत्येमागचा हेतू तपासला जात आहे. ही घटना ७ जून रोजी सकाळी ८.४६ वाजता घडली. ब्रिटीश कोलंबिया येथील १६४ स्ट्रीटच्या ९००-ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याचा कॉल सरे पोलिसांना आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना युवराज मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयित, मनवीर बसराम, साहिब बसरा, आणि सरे येथील हरकिरत झुट्टी आणि ओंटारियो येथील केलॉन फ्रँकोइस यांच्यावर शनिवारी खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात युवराजवर गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असले तरीही त्याच्या हत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हे कारण शोधण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे.

Protected Content