एअर स्ट्राईकनंतर घुसखोरीमध्ये ४३ टक्क्यांनी घट

loc ky8C 621x414@LiveMint

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | भारतीय हवाईदलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाईहल्ला केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत पाकिस्तानातून भारतीय हद्दीत होणाऱ्या घुसखोरीमध्ये ४३ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. सुरक्षा यंत्रणांनी उचललेल्या नियोजनबद्ध पावलांमुळेच दहशतवादी कारवायांना आळा घालण्यात मोठे यश आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले होते. त्यानंतर १२ दिवसांनी २६ फेब्रुवारीला भारताने या हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला करत बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.

या हवाई हल्ल्यानंतर सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीवर काही परिणाम झाला आहे का ? असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला असता पाकमधून काश्मिरात होणारी घुसखोरी ४३ टक्क्यांनी घटली असल्याची माहिती नित्यानंद राय यांनी दिली. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीला चाप बसवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार संयुक्तपणे काम करत आहे. आपले जवान नियंत्रण रेषेवर करडी नजर ठेवून आहेत. जवानांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रंही पुरवण्यात आली आहेत. गुप्तहेर खातेही आपली भूमिका चोख बजावतं आहे, असेही राय यांनी पुढे नमूद केले.

नियंत्रण रेषेलगत भारतीय सैन्याने विद्युत कुंपण उभे केले आहे. त्यासाठी ‘अॅण्टी इन्फिलट्रेशन ऑबस्टॅकल सीस्टीम’चा (एआयओएस) वापर करण्यात येत आहे. दहशतवादी हल्ले व घुसखोरी कमी होण्यात त्याचीही मदत झाली असल्याचे राय यांनी सांगितले. काश्मीरमध्ये अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असला तरी एआयओएसला मात्र अखंडपणे वीज पुरवठा केला जातो. त्यासाठी ठिकठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे, असे नमूद करताना आगामी काळात काश्मीरमधील घुसखोरीला पूर्णपणे आळा घातला जाईल, असा विश्वासही राय यांनी यावेळी व्यक्त केला.

Protected Content