पाकला धुळ चारली; भारताचा चँपिअन्स ट्रॉफीच्या सामन्यात दणदणीत विजय !

0
10

दुबई-वृत्तसेवा | चँपिअन्य ट्रॉफीच्या साखळी सामन्यात आज भारतीय संघाने पाकला धुळ चारत दणदणीत विजय संपादन केला. गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यानंतर विराट, श्रेयस व शुभमनच्या फलंदाजीने पाकचे कंबरडे मोडल्याने भारताचा विजय साकार झाला.

आज चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत रोमांचक सामना खेळला गेला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानला बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी सावध सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी झाली. ही जोडी हार्दिक पांड्याने तोडली. त्याने बाबरला २६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह २३ धावांवर विकेटकीपर केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. पुढच्याच षटकात इमाम उल हक २६ चेंडूंमध्ये १० धावा काढून धावबाद झाला. ४७ धावांवर दोन विकेट पडल्यानंतर सऊद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी झाली. यात शकीलने आपल्या वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी अक्षर पटेलने तोडली. त्याने रिझवानला ७७ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह ४६ धावांवर स्वच्छ बाद केले.

रिझवान बाद झाल्यावर पुन्हा विकेट्सचा खच पडला. शकील ७६ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह ६२ धावा काढून हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. तैयब ताहिर चार धावा आणि सलमान अली आगा १९ धावा काढून बाद झाले. सलमानला कुलदीपने, तर तैयबला जडेजाने बाद केले. शाहीन आफ्रिदीला खाते उघडता आले नाही. नसीम शाहने १४, तर हारिस रऊफने आठ धावा केल्या. पाकचा संघ सर्वबाद २४१ धावा करू शकला. म्हणजेच भारतासमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

२४२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्माने फटकेबाजी सुरू केली. मात्र २० धावांवर शाहिनने त्याला त्रिफळाचीत केले. यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी डाव सावरत आगेकुच केली. ही जोडी स्थिर झाली असे वाटत असतांनाच अबरारच्या एका अप्रतिम चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. त्याने ४६ धावा काढल्या. यानंतर मात्र विराट आणि श्रेयस अय्यरने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत भारताला विजयाकडे नेले. ही जोडी नाबाद राहणार असे वाटत असतांनाच श्रेयस ५६ धाव काढून बाद झाला. हार्दिक पंड्या देखील फक्त आठ धावा काढून तंबूत परतला. तर दुसरीकडे विराट कोहलीने जोरदार फटकेबाजी करत नाबाद शतक झळकावले.