जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रखडलेल्या वेतनाच्या निषेधार्थ जळगाव महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छता व कचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या घंटागाडी व सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असून, वेतन खात्यात जमा झाल्याशिवाय कोणतेही काम करणार नसल्याचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील कचरा संकलन व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
जळगाव शहरातील घराघरांतून कचरा संकलन करण्यासाठी बीव्हीजी कंपनीमार्फत सुमारे 100 घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्यांवरील कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन सातत्याने उशिरा मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अनेकदा संबंधित प्रशासन व ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला. आंदोलनस्थळी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. वाढती महागाई, घरखर्च, मुलांचे शिक्षण, बँकेचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागविणे रखडलेल्या वेतनामुळे कठीण झाले असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. पगार वेळेवर मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, वारंवार होणारा विलंब आता सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली. सफाई महिला कर्मचारी विमल पारधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, वेतन जमा झाल्याशिवाय कामावर परतणार नसल्याचे सांगितले. घंटागाडी कर्मचारी जय सपकाळे यांनीही अनेक महिन्यांपासून वेतनाबाबत अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत, सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, बीव्हीजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विनोद रेड्डी यांनी आंदोलनाची दखल घेत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी रखडलेले वेतन पुढील दोन दिवसांत अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्ष वेतन खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे सध्या कामबंद आंदोलन कायम आहे.

या आंदोलनाचा थेट परिणाम शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कचरा संकलन ठप्प झाल्यास विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचून अस्वच्छता वाढण्याबरोबरच आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने तातडीने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.



