Home Cities जळगाव जळगावात उद्या ‘दुग्ध उत्पादनातील संधी’ विषयावर विशेष कार्यशाळा

जळगावात उद्या ‘दुग्ध उत्पादनातील संधी’ विषयावर विशेष कार्यशाळा

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबतच पूरक उत्पन्नाचे सक्षम साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेची माहिती अधिकाधिक पशुपालक आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गुरुवार, दि. १६ जुलै रोजी ‘दुग्ध उत्पादनातील संधी’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील पशुपालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने तसेच जिल्हा पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. तापी खोरे गोकेंद्रीत शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम गुरुवार, दि. १६ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात पार पडणार आहे. कार्यशाळेत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध लाभांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यामध्ये दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, पशुपालनातून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे मार्ग, शासकीय अनुदान, वित्तीय सहाय्य तसेच दुग्ध उत्पादन क्षेत्रातील नव्या संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या तसेच विद्यमान पशुपालकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून शासनाच्या विविध योजनांची माहितीही उपस्थितांना मिळणार आहे.

याशिवाय केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीप दादा पाटील, विकास दूध फेडरेशनचे रोहित निकम तसेच जिल्हा दूध फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश मोरखडे हे देखील कार्यशाळेत उपस्थित राहून दुग्ध व्यवसायातील संधी, बाजारपेठेतील बदल आणि शाश्वत पशुपालनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप झोड यांनी जिल्ह्यातील सर्व पशुपालक, दुग्ध उत्पादक आणि शेतकऱ्यांना या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या विविध योजनांची अचूक माहिती मिळवून त्याचा लाभ घेतल्यास ग्रामीण भागातील पशुधन व्यवसाय अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound