अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुका धार्मिक व व्यापारी दृष्टीने महत्वपूर्ण नावारूपाला आलेला आहे. त्यामुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दोन राज्य नजिक असल्याने माणसांची वर्दळ वाढली असल्याने शहरात गुन्हेगारांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
गेल्या काही वर्षात गुन्हेगारी उच्च कोटीला गेली आहे. खून, बलात्कार, दरोडे व चोऱ्या माऱ्या या सारख्या गुन्ह्याने अमळनेर तालुका गाजत आहे. म्हणून तालुक्यातील वाढती गुन्हेगारी पाहता गेल्या अनेक वर्षापासून अमळनेर पोलिस ठाण्यात पुरेसे पोलिस कर्मचारी संख्या बळ नसल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक पोलीस प्रशासनास नाकीनऊ येत आहे.
तरी तालुक्यात शांतता नांदावी व नागरिकांना भय मुक्त जीवन जगता यावे, याकरिता आपल्या अधिकाराचा वापर करून त्वरित पुरेसे पोलिस अधिकारी व कर्मचारी देऊन सहकार्य करावे. असे निवेदन मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष विजय गाढे, अमळनेर तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, सचिव सूरेश कांबळे, उपाध्यक्ष प्रवीण बैसाणे, नूर खान, खजिनदार हितेंद्र बडगुजर, संघटक आत्माराम अहिरे आदी पत्रकार उपस्थित होते.