
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेरने यंदा उल्लेखनीय यश संपादन करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या वर्षी विद्यालयातील एकूण ७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण होत पात्र ठरले असून त्यातून १५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या निकालामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी घेतली जाणारी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील व शिक्षक डी. ए. धनगर यांचे मार्गदर्शन लाभले असून मुस्ताक शेख व शुभम निकम यांनी तांत्रिक सहकार्य केले. तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलची विद्यार्थिनी संजना ज्ञानेश्वर अहिरे हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून तिला मुख्याध्यापिका अनिता बोरसे व शिक्षिका मनीषा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा विद्यालयात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, संचालक गुणवंत पाटील, भास्करराव बोरसे व किरण पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी परीक्षेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा योग्य वापर शिक्षणासाठीच करावा, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डी. वाय. पाटील यांनी केले.
दरम्यान, या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पाटील मोहित रमेश, पाटील शिवम मनोहर, पाटील विराज दीपक, शिंदे गोपाल किशोर, पाटील दीपांशू योगेश, शिंदे पियुष अरुण, पाटील शिवम देविदास, ठाकरे ललित सुनील, पाटील चाणक्य प्रशांत, पाटील मनन राकेश, महाजन नरेश चंद्रकांत, शिंदे पुष्कर विनोद, सोनवणे हर्षल प्रदीप, पाटील भार्गव महेंद्र व खंगार पूरब राजू यांचा समावेश आहे.



