जिल्ह्याच्या तापमानात वाढ ; पारा ४१ अंशावर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।- बेमोसमी पावसाने उघडीप घेतल्यानंतर जिल्ह्याची वाटचाल आता टळटळीत उन्हाळय़ाकडे सुरू झाली आहे. दोन दिवसापूर्वी तापमान ४२ अंशावर गेले होते. त्यात काहीसा बदल झाला असला तरी वाढत्या उष्णतेमुळे काहिली प्रचंड वाढली असून तापमान ४१ अंशांवर आहे. रणरणत्या उन्हामुळे दुपारच्या वेळेस रस्ते, बाजारपेठेतील वर्दळ कमी होऊ लागली असून वाढत्या तापमानाची फेब्रुवारीअखेरीस सुरुवात झाली होती .

जिल्ह्यात गेल्या सप्ताहापासून तापमानाचा पारा फेब्रुवारीनंतर चांगलाच वाढला असून या आर्द्रतादेखील कमी झाली आहे. या वाटचालीत मध्यंतरी ढगाळ वातावरण, थोड्याफार प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने अडथळे आले होते. पावसाने उघडीप घेतल्यानंतर तापमान पुन्हा वाढत आहे. मंगळवारी ३७ ते ३९ अंशांची नोंद झाली. सकाळी १० वाजेपासून उन्हाचा तडाखा जाणवतो. दुपारी त्यात भर पडत असल्याने टळटळीत उन्हात घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. या काळात रस्ते आणि बाजारपेठेतील गर्दी कमी होत असल्याचे दिसून येते. या वर्षी तुलनेत लवकर तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर व ग्रामीण भागातील वेगळी स्थिती नाही. शेत शिवारातही शुकशुकाट दिसून येतो.

वाढत्या तापमानामुळे विजेचा वापर वाढला
उकाडय़ापासून बचाव करण्यासाठी नागरिक पंखे, वातानुकूलित यंत्र, कुलरचा आधार घेत आहे. एरवी पावसाळय़ातच वापरल्या जाणाऱ्या छत्र्या वृद्ध नागरिकांसह महिला मुलीकडे आता उन्हाळय़ात दिसून येत आहेत. शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. ठिकठिकाणी उसाचा रस, कुल्फी, ताक आदी खरेदीकडे कल वाढला आहे. उसाच्या रसाला मोठी मागणी असून लिंबू शिकांजीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, शरीरातील पाणी कमी होणे, भोवळ येणे वा तत्सम विकारांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

Protected Content