पवार पावसात भिजले आणि न्यूमोनिया भाजपाला झाला- राष्ट्रवादीचा पलटवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार यांच्यावर टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीने पलटवार करत शरद पवार पावसात भिजले आणि न्यूमोनिया भाजपला झाला अशी टीका केली आहे.

शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी टीका करतांना  २०१९ला सातार्‍यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही,  असे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे. या संदर्भात तपासे म्हणालेत की, सातार्‍यातील पावसाळी सभेत शरद पवारांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे. म्हणूनच वारंवार शरद पवारांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड आहे.

जनता भाजपासोबत असल्यामुळे तुम्ही किती जरी संघर्ष केला, आम्ही काहीतरी मोठे आहोत असं वातावरण तयार केलं तरी २०१९ ला सातार्‍यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही, अशी टीका पडळकरांनी केली होती.

त्यांची (राष्ट्रवादीची) ५४ ची संख्या कायम ठेवण्यासाठी त्यांना वारंवार त्यांच्याच आमदारांना विश्वास द्यावा लागतोय. तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका असं सांगावं लागतंय. पण तुमच्या हातातच काही नाही. कारण त्यांना त्यांची ५४ ची संख्या कमी होऊ नये याची काळजी असल्याने वारंवार सांगावं लागतंय की भाजपाला मी येऊ देणार नाही, असही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.

Protected Content