


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मागील दीड महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, नुकसानभरपाई आणि पीकविम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाचा दीर्घ खंड पिकांसाठी अडचणीचा ठरला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि पेरणीसाठी मोठा खर्च केला असून, पिकांना आवश्यक पाऊस न मिळाल्याने ही गुंतवणूक धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने मुक्ताईनगर, बोदवडसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महसूल व कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि त्याआधारे पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
यासोबतच पात्र शेतकऱ्यांना पीकविमा लाभ, दुष्काळी सवलती आणि आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी शेतीचे नुकसान झाल्यास त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होत असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम अडचणीत आल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी पीक सर्वेक्षण, पंचनामे, नुकसानभरपाई, पीकविमा आणि दुष्काळी सवलतींची मागणी करण्यात आली आहे.



