


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला जाता आले नाही, या कारणातून चोपडा तालुक्यातील घुमावल येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची हळहळजनक घटना घडली. जयेश संदीप पाटील असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
घुमावल येथे २० सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाचा सातवा दिवस होता. सायंकाळी जयेशने आपल्या चुलत भावंडांसह गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मिरवणूक प्लॉट परिसरात असल्याने, ती आपल्या भागात आल्यानंतर मिरवणूक पाहण्यासाठी जा, तोपर्यंत अभ्यास करा, असे पालकांनी मुलांना सांगितले. त्यानंतर जयेशसह इतर मुले अभ्यास करण्यासाठी बसली.
मात्र काही वेळाने जयेश अभ्यासाच्या खोलीत दिसत नसल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. त्यामुळे आईने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत जयेशने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जयेशला मृत घोषित केले. या घटनेने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयेश हा चोपडा येथील पंकज विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता.
या घटनेप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव नेवे यांच्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
जयेशच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे घुमावल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



